सांगोला : तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील मांजरी येथील माजी उपसभापती नारायण शिवाजी जगताप यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व त्यांच्या समवेत आलेल्या काही व्यक्तींविरोधात आरोप करत सांगोला पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. आमदार व त्यांच्या समर्थकांनी घरी येऊन मारहाण, शिवीगाळ व दहशत निर्माण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे निवेदन देण्यासाठी आमदार बाबासाहेब देशमुख यांचे बंधू डॉ. अनिकेत देशमुख स्वतः उपस्थित होते.
माजी उपसभापती नारायण जगताप यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी फोन करून ‘चहा पिण्यास येतो’ असे सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आमदार त्यांच्या सोबत ६० ते ७० जणांना घेऊन आपल्या घरी आले. यावेळी आपल्या मुलांबाबत तक्रार करीत आमदार चिडचिड करत होते.
आमदार डॉ. देशमुख त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींनी मला धरपकड केली तसेच माझ्या पत्नी व मुलांबाबत अश्लील शिवीगाळ व धमक्या दिल्याचा असा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबाला उध्वस्त करण्याची धमकी दिल्याचेही निवेदनात नमूद आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच संबंधित व्यक्तींवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जगताप यांनी पोलिसांकडे केली आहे. “मला किंवा माझ्या कुटुंबाला काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास आमदार व प्रशासन जबाबदार राहील,” असेही पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आमदारांच्या विरोधात मांजरी गाव कडकडीत बंद
आमदार बाबासाहेब देशमुख व त्यांच्या समवेत आलेल्या 60 ते 70 लोकांनी गावात येऊन गोंधळ घातल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार दि 30 डिसेंबर रोजी मांजरी गाव बंदची हाक दिली होती. या बंदला सर्वपक्षीय गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील दुकाने व व्यवहार बंद ठेवले होते. दरम्यान या घटनेची सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
खालच्या पातळीवरील टीकाटिप्पणी कधीही खपवून घेणार नाही
“वैयक्तिक व कौटुंबिक खालच्या पातळीवरील टीकाटिप्पणी कधीही खपवून घेतली जाणार नाही. काही गोष्टी समजल्यानंतर मी विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे चहाही पिऊन आलो. मी मुंबईसाठी निघून गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असेल तर त्याची दखल घेतली जाईल; मात्र स्वर्गीय आबासाहेबांचा स्वाभिमानी विचार मी कधीही गहाण ठेवणार नाही.”
-आमदार बाबासाहेब देशमुख
