c14ab6364c845ff284028d4249ffe0d11c1a0d4616dbee3a7448c4342e44dd79.0

राज्यात बहुचर्चित ठरलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनाबाबत अखेर मोठा निर्णय जाहीर झाल्यानंतर पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर व सांगोला तालुक्यातील आधीचे रेखांकन रद्द करून मार्ग दुसरीकडे वळवण्यात येणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे थेट बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकत शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काय होतं प्रकरण?
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पंढरपूर व सांगोला तालुक्यातील ज्या भागातून जात होता हा संपूर्ण परिसर अत्यंत सुपीक पट्टा मानला जातो येथे ऊस, द्राक्षे, डाळिंब यांसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या पिकांच्या जोरावर येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले असताना, याच समृद्ध भागातून महामार्ग नेण्यात येणार असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

महामार्गाचे प्राथमिक रेखांकन आणि सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष जमिनीच्या मोबदल्याचे निकष समोर आले. लाखो रुपये किमतीची बागायती जमीन अत्यल्प दरात संपादित होणार असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. सर्वेक्षणाच्या वेळी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट विरोध केला. काही भागात प्रशासनाने सक्तीने सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. या काळात काही शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील आधीचा मार्ग रद्द करण्यात आला असून शक्तीपीठ महामार्गाची दिशा बदलण्यात येणार आहे.

कोणत्या गावांतून जाणार?
नवीन रेखांकनानुसार, हा महामार्ग आता पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणार आहे. बार्शी, वैराग, करकंब, भोसे, पटवर्धन कुरोली मार्गे हा रस्ता सांगोल्याला जोडला जाणार असल्याची माहिती आहे. नव्या मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले असले तरी प्रशासनाकडून याबाबत गोपनीयता पाळली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलामुळे पंढरपूर व सांगोला तालुक्यातील नवीन भागात विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *