20260119 172119 scaled

मुक्या जनावरांची दलाली करणाऱ्या खाकी वर्दीतील कसायांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

देशात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारने हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींची कत्तल होऊ नये म्हणून “गोहत्या प्रतिबंध कायदा” अस्तित्वात आणला आहे. परंतु, सांगोल्यात या कायद्याला खुद्द पोलीसांनीच धाब्यावर बसवले आहे. गोरक्षकांनी पकडून दिलेली जनावरे सांगोला पोलीस ठाण्यातील काही खाकी वर्दीतील कसाई प्रवृत्तीच्या २ ते ३ पोलीसांनी परस्पररित्या कसायाच्या दावणीला बांधण्याचे पाप केले आहे. याबाबत काही गोरक्षकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीसांच्या वेशात वावरणाऱ्या या कसायांच्या दलालांवर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार ? याकडे सबंध जिल्ह्यातील आणि सांगोला तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी सांगोला आणि पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो काही गोरक्षकांनी पोलीसांना पकडून दिला होता. या टेम्पोमधून कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जात होती. हा प्रकार सांगोला तालुक्याच्या हद्दीत घडल्याने गोरक्षकांनी सदरचा आयशर टेम्पो सांगोला पोलीसांच्या हवाली केला. यावेळी कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या कसायाने एका गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीला संपर्क करून त्यांना आपण एक पशुपालक असून सदरची जनावरे मी पाळण्यासाठी घेऊन जात असताना माझी जनावरे पोलीसांनी पकडली आहेत. मी पोलीसांना माझ्या पद्धतीने समजून सांगितले असून त्यांना खात्री पटली आहे की, मी एक पशुपालक शेतकरी आहे. तुम्ही फक्त मला एक पत्र द्या अशी खोटी माहिती दिली. यावेळी सदरच्या गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीने मी सध्या आजारी आहे उपचारासाठी मी बाहेरगावी आहे त्यामुळे मी तुम्हाला पत्र देऊ शकत नाही असे स्पष्ट सांगितले परंतु, तरीही कसायाने वारंवार कॉल करून आणि गोड बोलून आपण शेजारच्या गावचा पशुपालक शेतकरीच असल्याचे भासवून पोलीसांच्या सल्ल्यानुसार गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीला गोशाळेतील जनावरांना चाऱ्यासाठी मी तुम्हाला मदत करतो असे म्हणून फसवून ते बाहेरगावी असताना त्यांच्याकडून पत्र घेतले आणि न मागताच गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीच्या फोन पे खात्यावर २५ हजार रुपये पाठवले. दरम्यान दवाखान्यात उपचार घेत असल्याने खात्यावर आलेली रक्कम त्यांना तत्काळ समजली नाही परंतु, सदरची घटना समाजातच त्यांनी २५ हजारांची रक्कम ज्या खात्यावरून आली त्याच खात्यावर जशीच्या तशी माघारी पाठवली. तत्पूर्वी कसायांना सामील असणाऱ्या पोलीसांनीही कागदी घोडे नाचवून कसायाकडून पैसे घेऊन टेम्पोचे गोशाळेच्या समोर काही फोटो काढून परस्पररित्या हा जनावरांचा टेम्पो सोडून दिला.

दरम्यान गोशाळा चालवणारे व्यक्ती त्यांच्यावर सुरू असणारे उपचार पूर्ण करून आपल्या गावी आले असता त्यांनी झालेला प्रकार काही गोरक्षकांना सांगितला यावेळी सदरचा आयशर टेम्पो काही गोरक्षकांनीच पकडून दिला होता अशी माहिती समोर आली यानंतर काही गोरक्षकांनी याबाबत संबंधित कसाई आणि पोलीसांच्या वेशातील कसाई या दोघांच्याही विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता आपले पितळ उघडे पडणार हे लक्षात आल्यावर या पापात सहभागी असणारे पोलीस आणि कसाई गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीला वारंवार कॉल करून सोडलेली जनावरे पुन्हा आणून तुमच्या गोशाळेत सोडतो म्हणू लागले आहेत.या केवळ सांगोला तालुका नाही तर सोलापूर जिल्हा हादरवणाऱ्या या घटनेचा तपास आता एका सहायक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. या घटनेबाबत आता गोरक्षक, गोशाळा मालक आणि पोलीसांचा वेशात वावरणाऱ्या कसायांच्या दलालांची चौकशी सुरू आहे. याबाबत गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीने जो प्रकार घडला त्याबाबत त्या दलाल पोलीसांच्या आणि कसायाच्या विरोधात रीतसर जबाब दिला आहे यावर आता संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय अहवाल पाठवणार आणि यावर वरिष्ठ कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील गोरक्षक, शेतकरी, पशुपालक आणि सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

निलंबित नको, असे दलाल पोलीस बडतर्फ करा

हिंदु संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या गायींचे रक्षण व्हावे म्हणून सरकारने “गोहत्या प्रतिबंध कायदा” अस्तित्वात आणला आहे. हा कायदा राबविण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जर कसायांना सामील असतील आणि कायदा पायदळी तुडवत असतील तर अशा दलाल पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित करून भागणार नाही त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी लेखी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार आहे.

मा. सिद्धेश्वर गाडे,
सरचिटणीस, भाजप सांगोला.

“त्या” दलाल पोलीसांची झोप उडाली

ज्या गोरक्षकांनी अवैध जनावरे वाहतूक करणारा टेम्पो पकडून दिला ते गोरक्षक आणि ज्या गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीची आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ते कुणीही आता शांत बसत नाहीत हे लक्षात येताच त्या दलाल पोलीसांची आता झोप उडाली आहे. गोशाळा चालवणाऱ्या व्यक्तीला वारंवार कॉल करून तुम्ही माझे व्हॉट्स ॲप कॉल उचला असे निरोप दिले जात आहेत. परंतु, अशा दलाल पोलीसांना आणि कसायांना आता कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवणार असा निर्धारच गोरक्षक आणि गोशाळा मालकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *