634fe426357360259d74a02c32e73e57999f5d4956f8f08b48cac829a6d4880c.0

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

सोनंद मंडलचे वादग्रस्त मंडल अधिकारी उल्हास पोलके यांच्यावर अखेर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लल्लन पवार रा. गळवेवाडी ता सांगोला यांना एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी मंडल अधिकारी पोलके यांनी दिली होती. हे प्रकरण आता मंडलअधिकारी पोलके यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

तक्रारदार लल्लन पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंडलाधिकारी उल्हास पोलके यांनी तक्रारदार यांचे जे.सी.बी. बेकायदेशीररित्या आपल्या ताब्यात घेऊन लल्लन पवार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. शिवाय घटनास्थळी केवळ २ ब्रास इतका वाळूसाठा आढळून आला असतानाही मंडल अधिकारी उल्हास पोलके यांनी तब्बल ५ हजार ब्रास वाळू दाखविण्याचा प्रयत्न करून खोटा पंचनामा करण्याचा प्रयत्न केला होता. तक्रारदार लल्लन पवार यांनी मंडलाधिकारी उल्हास पोलके यांना एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तक्रारदार पवार यांची जेसीबी मशीन ताब्यात घेऊन उलट पवार यांना पैसे न दिल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. त्याबाबत तक्रारदार लल्लन पवार यांनी सदर प्रकरणी तहसीलदार सांगोला यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज दाखल केला होता तत्कालीन तहसीलदार संतोष कणसे यांनी सदर अर्जाची चौकशी करून जिल्हाधिकारी सोलापुर यांच्याकडे अहवाल पाठवला होता या अहवालानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कर्तव्यात कसूर करून अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या वादग्रस्त मंडल अधिकारी उल्हास पोलके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *