सांगोला ; तालुका प्रतिनिधी
नागपूर–पत्रादेवी–गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सोलापूर जिल्ह्यातील मुळ आरेखणात कोणताही बदल करण्यात येऊ नये, अन्यथा रस्ता बाधित तसेच महामार्गास समर्थन देणारे शेतकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारतील, आणि याची गंभीर किंमत सरकारला मोजावी लागेल असा गंभीर इशारा सांगोल्यातील बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
सांगोल्यात रविवार (ता. १४) रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या सांगोला तालुक्यातील मार्गात बदल करू नये यासाठी बाधित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी चिंचोलीचे हरिभाऊ पाटील अनिल बेहेरे, संतोष पाटील, नानासो पुजारी, तुषार चव्हाण, दत्तात्रय चव्हाण,बिरा बेहेरे, सांगोल्याचे सुदर्शन जाधव, काशिलिंग सरगर,अजित नायकुडे, चोपडीचे प्रवीण चौगुले, बामणीचे दादा पिंगळे तसेच कमलापुरचे नवनाथ पडवळे आदीसह य. मंगेवाडीचे शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाचे आरेखण यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे जाहीर करून त्याची प्रसिद्धी वृत्तपत्रांत करण्यात आली होती. त्या मुळ आरेखणानुसार मोनार्क कंपनीमार्फत प्रत्यक्ष शेतजमिनीवर खांब उभे करून मोजणीचे काम सुरू असून, उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत नोटिसा बजावून सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यांतील मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील मोजणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मुख्यमंत्री यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार धाराशिवपर्यंत महामार्ग मुळ आरेखणानुसार राहील, मात्र उस्मानाबाद, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत काही प्रमाणात विरोध असल्याने आरेखणात बदल केला जाऊ शकतो, असे वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश मोजणी पूर्ण झाल्याने उर्वरित काम तातडीने पूर्ण करून अंतर्गत मूल्यांकन करण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून उर्वरित मोजणी कामात कोणताही अडथळा येऊ न देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, भूसंपादन अधिकारी व तथाकथित विरोधक यांची आजअखेर कोणतीही संयुक्त बैठक न झाल्याने चुकीच्या अफवा पसरवल्या जात असून, काही ठरावीक लोक दलाली व राजकीय हेतूने माध्यमांना चुकीची माहिती देत सरकारची बदनामी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुळ आरेखणात कोणताही बदल न करता जीएमआर पूर्ण करून महामार्गाचे काम सुरू करण्यात यावे, यास शेतकऱ्यांची संपूर्ण संमती आहे. मात्र, जर आरेखणात बदल करण्यात आला, तर संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा रस्ता बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
