सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे विभागीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या तीन दिवसीय विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके उपस्थित होते. या वेळी विशेष उपस्थिती म.शं. घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, सत्येन जाधव, हाजीमलंग नदाफ, महेश ढेंबरे व प्रशांत मस्के आदी मान्यवरांची होती.
या स्पर्धेत सोलापूर, अहिल्यानगर, पुणे व पिंपरी चिंचवड (शहर व ग्रामीण) अशा विभागांमधून १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे संघ सहभागी झाले होते. एकूण १४० खेळाडूंनी या स्पर्धेत आपले कौशल्य सादर केले.
प्रत्येक दिवशी १४ संघ, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शहर व ग्रामीण विभागातून प्रत्येकी पाच खेळाडू—असे एकूण ३५ खेळाडू दररोज निवड चाचणीसाठी सहभागी झाले. त्यात ७० मुले आणि ७० मुली अशा संतुलित सहभागाने स्पर्धेला रंगत आणली.
विजयी संघांमध्ये १४ व १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या गटात पुणे शहराचा संघ तर १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात सोलापूर शहराचा संघ विजयी ठरला असून हे संघ आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांनी सर्व स्पर्धक, प्रशिक्षक व आयोजकांचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
