IMG 20260116 204829

सांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील खवासपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाजगी महिला स्वयंसेविकेकडून अध्यापन करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ‘डमी शिक्षिका’ नेमल्याच्या आरोपांवर पंचायत समिती शिक्षण विभागाने खुलासा केला असून, हा प्रकार स्वयंसेवक म्हणून शैक्षणिक कामकाजात मदत घेण्यापुरताच असल्याचे स्पष्ट केले आहे.खवासपूर येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण सात वर्ग असून केवळ ६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्येनुसार येथे तीन शिक्षक कार्यरत आहेत. पहिली ते तिसरी, चौथी-पाचवी आणि सहावी-सातवी असे वर्गगट तयार करून अध्यापन केले जाते. मात्र, सात वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक असल्याने अध्यापनाचा ताण वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. या शाळेत खाजगी महिला स्वयंसेविकेकडून अध्यापन करून घेतले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. याप्रकरणी मुख्याध्यापक राजकुमार भोसले यांची तातडीने बदली करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. यापूर्वीही शिस्तभंग, अनियमित हजेरी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच शासकीय सुविधांबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीअंती पंचायत समिती सांगोला येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने खुलासा केला आहे. विस्तार अधिकारी महूद बीट व गटशिक्षणाधिकारी सांगोला यांच्या चौकशी अहवालानुसार, शाळा व्यवस्थापन समिती खवासपूर यांनी दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी ठराव करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून श्रीमती धनश्री पाटील या एचएससी डी.एड शैक्षणिक पात्रता असलेल्या महिलेची स्वयंसेवक म्हणून शैक्षणिक कामकाजात मदत घेण्याचा निर्णय घेतला होता.गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या खुलाशानुसार, संबंधित स्वयंसेविका ही नियमित शिक्षकांच्या जागी ‘डमी शिक्षक’ म्हणून नियुक्त करण्यात आलेली नसून, मुख्याध्यापकाने स्वतःच्या जागी कोणतीही डमी शिक्षक नियुक्त केलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

“खवासपूर येथील शाळेबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली असून त्याचा संपूर्ण अहवाल शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. शाळेतील स्वयंसेविका ही डमी शिक्षक नसून कामकाजात सहकार्य करण्यासाठी घेण्यात आलेली आहे –

सुयोग नवले,
गटशिक्षणाधिकारी, सांगोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *