IMG 20260803 090255 scaled

३० वर्षांच्या शैक्षणिक सेवेला मिळाली नवी जबाबदारी; कोळा विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यभार

सांगोला(वार्ताहर): सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथील कर्तव्यदक्ष पर्यवेक्षक तथा गणित विषयातील अनुभवी शिक्षक श्री. उत्तम सरगर यांची पदोन्नतीने कोळा विद्यामंदिर, कोळा येथे मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. उत्तम सरगर यांनी मागील ३० वर्षांपासून सांगोला विद्यामंदिर प्रशालेत गणित विषयाचे अध्यापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. विशेषतः इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयात भक्कम पाया निर्माण करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आपल्या दीर्घ शैक्षणिक सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यालयाच्या गुणवत्तावृद्धीसाठीही उल्लेखनीय कार्य केले आहे.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते श्री. उत्तम सरगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. चारुदत्त जगताप,उपमुख्यध्यापक श्री. प्रदिप धुकटे, उपप्रचार्य श्री. शिवशंकर तटाळे , पर्यवेक्षक श्री. काकासाहेब नरुटे, सौ. शुभांगी घोंगडे, मुख्य लिपिक श्री. हेमंत नलवडे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या वतीने श्री. उत्तम सरगर यांचे अभिनंदन करून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

मुख्याध्यापकपदी नियुक्तीनंतर आपले मनोगत व्यक्त करताना श्री. उत्तम सरगर म्हणाले, “माझ्यावर सोपविण्यात आलेली मुख्याध्यापक पदाची जबाबदारी मी प्रामाणिकपणे व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यालयाची सातत्यपूर्ण प्रगती यासाठी मी कटिबद्ध आहे.”

श्री. उत्तम सरगर यांच्या पदोन्नतीबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला परिवार, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *