राज्य गुणवत्ता यादीत पाचवा, जिल्ह्यात प्रथम क्रमांक; सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात अभिमानाची भर
सांगोला निर्भीड वार्ता(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ७वी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथील विद्यार्थी अर्णव चतुरगुण औताडे याने राज्य गुणवत्ता यादीत ५वा क्रमांक, तर सोलापूर जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. अर्णवच्या या उल्लेखनीय यशामुळे सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात कुमार अर्णव चतुरगुण औताडे याचा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अर्णवचे पालक श्री. चतुरगुण औताडे व मार्गदर्शक शिक्षक श्री.अशपाक काझी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी माननीय जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कादर शेख तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, मान्यवर, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अर्णवने सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश संपादन केले. राज्य गुणवत्ता यादीत पाचवा आणि सोलापूर जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणे ही सांगोला विद्यामंदिर प्रशालेसह संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.विशेष म्हणजे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षात अर्णवने मिळविलेले हे यश संस्थेसाठी विशेष अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरले आहे. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यार्थ्याने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करून शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करणे ही या ऐतिहासिक वर्षाला लाभलेली अभिमानाची सुवर्ण किनार आहे. अर्णवचे हे यश संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला अधिक बळ देणारे असून, अमृत महोत्सवी वर्षातील एक अविस्मरणीय शैक्षणिक कामगिरी म्हणून त्याची नोंद निश्चितच केली जाईल.
अर्णवच्या या यशामध्ये त्याचे पालक, मार्गदर्शक शिक्षक तसेच शाळेचे शैक्षणिक वातावरण यांचा मोलाचा वाटा आहे. त्याच्या उला उज्ज्वल यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव श्री.मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव श्री.प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार श्री.शंकरराव सावंत, मुख्याध्यापक श्री.चारुदत्त जगताप,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्गाने अभिनंदन केले.
कुमार अर्णव चतुरगुण औताडे याने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, अमृत महोत्सव वर्षात मिळालेल्या या यशामुळे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या शैक्षणिक यशाची परंपरा अधिक समृद्ध झाली आहे.
