नाझरा (वार्ताहर):- गेली तीस वर्ष प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देत जगण्यातल्या असंख्य प्रयोगांचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या नाझरा विद्यामंदिर मधील प्रयोगशाळा परिचारक सिद्धेश्वर काळे यांचा काल नाझरा विद्यामंदिर मध्ये सेवापूर्ती सत्कार समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक विनायक पाटील, युवानेते उल्हास धायगुडे, सिद्धेश्वर काळे यांच्या सौभाग्यवती उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दिलीप सरगर यांनी काळे यांची विविध गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करत केवळ शाळेपुरतेच किंवा विद्यार्थ्यांपुरतेच ते परिचित नसून पंचक्रोशी मध्ये असंख्य लोक त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ओळखतात.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उभयांतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य बिभीषण माने म्हणाले की, सिद्धेश्वर काळे यांच्या प्रयोगशाळेतील कामाची पद्धत अतिशय उल्लेखनीय होती. स्वच्छता व नीटनेटकेपणा हे त्यांच्या कामाचे खास वैशिष्ट्य होते. पालकांप्रती असलेला दृढ संबंध व त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितपणे सर्वांच्या स्मरणात राहतील. सत्काराला उत्तर देताना सिद्धेश्वर काळे म्हणाले की कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या कृपाशीर्वादाने व संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनामुळे माझी सेवा यशस्वीपणे पूर्ण झाली. मी जरी सेवानिवृत्त झालो असलो तरी या पुढील काळात विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींसाठी मी नेहमीच हजर असेल. यावेळी सोमनाथ सपाटे, युवा नेते उल्हास धायगुडे यांनी आपल्या मनोगातून सिद्धेश्वर काळे यांच्या स्वभावांचे वैशिष्ट्य स्पष्ट केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक मोहन भोसले यांनी मांडले.
