20260106 092436 scaled

पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे आज पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. सुरेश कलमाडी यांना पुण्यात मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यविधी दुपारी ३.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे.

पायलट ते खासदार…
जन्म 1 मे 1944 रोजी झाला असून, राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय हवाई दलात 6 वर्षांहून अधिक काळ पायलट म्हणून काम केले होते. हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते पुण्याचे खासदार म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते आणि त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही पद भूषवलं होतं. विशेष म्हणजे, रेल्वे राज्यमंत्री असताना रेल्वे बजेट मांडणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले होते. पुण्यात ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी शहराला एक नवी ओळख मिळवून दिली.

पुण्याचे कारभारी…
पुणे शहराच्या विकासासाठी, विशेषतः विमानतळ विकास, मेट्रो प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये त्यांचा मोठा हात होता. त्यांच्या याच राजकीय वर्चस्व, प्रशासकीय पकड आणि विकासकामांच्या जबाबदारीमुळे त्यांना पुण्याचे ‘कारभारी’ म्हणून ओळखले जाऊ लागले, जणू ते शहराचे व्यवस्थापकच आहेत. क्रीडा प्रशासन: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांची भूमिका आणि त्यानंतरचे वाद यामुळेही ते चर्चेत होते, पण पुण्याच्या संदर्भात त्यांची ‘कारभारी’ ही उपाधी स्थानिक राजकारणातून आली होती.

भ्रष्टाचाराचे आरोप अन् क्लिन चीट
२०१० दिल्ली कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून चर्चेत आलेले कलमाडी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादात सापडले होते. सीबीआय आणि ईडीच्या तपासात अटक झाली, मात्र अनेक प्रकरणांत निर्दोष मुक्तता मिळाली. काँग्रेस पक्षाचे माजी नेते असलेल्या कलमाडी यांनी क्रीडा आणि राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.२०१० मधील राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता. त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती. पण अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल 2025 मध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली होती यामुळे पुन्हा एकदा त्यांची प्रतिमा चांगली होऊ लागली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुणे महापालिकेत दिलेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *