20260103 230719 scaled

साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळे फासल्याने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी गालबोट लागले. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना काळे फासण्यात आल्याने संमेलनात एकच खळबळ उडाली. काळे फासणाऱ्या संदीप जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महामंडळाच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

साहित्य संमेलनाचा आज तिसरा दिवस होता. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे दुपारी प्रकाशन कट्ट्यावरून खाली येत असताना अचानक एकाने त्यांना काळे फासले. त्यामुळं संमेलनात गोंधळ उडाला. काही वेळातच शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काळे फासणाऱ्या तरूणास ताब्यात घेतले. काळे फासण्यासाठी वापरलेल्या केमिकलमुळे विनोद कुलकर्णी यांना श्वास घेण्यासास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.

या घटनेबद्दल माहिती देताना विनोद कुलकर्णी म्हणाले की, दोन-तीन हल्लेखोरांनी केमिकलसारखा काळा पदार्थ माझ्या डोळ्यात घातला. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. संमेलन उधळून लावू, तुम्हाला संपवू, अशी धमकी त्यांनी दिली.

दरम्यान, साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांना काळे फासल्याच्या घटनेनंतर साहित्यिक आणि विचारवंतांच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

साताऱ्यातील पत्रकारांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला हा समस्त पत्रकारांवरील हल्ला असल्याचे आम्ही मानतो, अशा संतप्त भावना पत्रकारांनी व्यक्त केल्या. तसेच हल्लेखोर संदीप जाधव या तरूणाने कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केलंय का, याचा तपास करावा. त्याच्या कॉल डिटेल्स तपासाव्यात, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.

शाहुपुरी पोलिसांनी संदीप जाधव यास ताब्यात घेतल्यानंतर घटनेच्या अनुषंगाने त्याची चौकशी केली. ‘शेतकरी कर्जमाफी होत नाही. पण, संमेलनाला सरकारने दोन कोटी दिले’. त्याच्या निषेधार्थ हे कृत्य केल्याची माहिती त्याने चौकशीत दिली असल्याचे शाहुपुरी पोलिसांनी सांगितले.

संदीप जाधव याने साताऱ्यात अनेकदा आंदोलनाची स्टंटबाजी केली आहे. ९ ऑगस्ट रोजी (क्रांतीदिनी) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थाबाहेर मोठ्या आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला हार घालून जिल्हा परिषदेसमोर देखील स्टंट केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *