लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी उत्साह दाखवला असताना सांगोला शहरातील बुंजकर वस्ती येथील नितीन व सुजाता हे नवविवाहित जोडपे चर्चेचा विषय ठरले. ‘हो’काराची मंगलाक्षरे उच्चारताच, लग्नाची विधी संपल्या–संपल्या या जोडप्याने थेट मतदान केंद्राकडे मोर्चा वळवला.
विवाहसोहळा आटोपताच वधू–वरांनी कुटुंबीयांसह सरळ मतदान केंद्र गाठले. केंद्रात पोहोचताच त्यांच्या आगमनाने उपस्थित नागरिक आणि कर्मचारी आश्चर्यचकित झालेच, शिवाय सर्वांनी त्यांच्या जबाबदार वृत्तीचे कौतुकही केले.
रांग तोडून नाही, नियमितपणे सर्वांसोबत उभे राहून या जोडप्याने मतदान केले. मतदान करून बाहेर पडताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. लग्नसोहळ्यात उपस्थित पाहुण्यांमध्येही या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.
वराने सांगितले,
“आयुष्यातील नवीन सुरुवात कर्तव्यापासूनच करावी, असं आम्हाला वाटलं. म्हणून लग्नानंतरचा पहिलाच निर्णय मतदानाचा.”
वधूनेही उत्साह व्यक्त करत म्हटले,
“लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा हक्क चुकवायचा नाही, अशी आमची भूमिका होती.”
मतदान आटोपून बाहेर पडताच नवदांपत्याला त्या ठिकाणी मतदान केंद्रास भेट देण्यासाठी आलेले प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांनी शुभ आशीर्वाद दिले.
