सांगोला वार्ताहर (दि.18नोव्हेंबर)
सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ता हातात घेतल्यापासून भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे—दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रभाव वाढवणे, बलाढ्य गट पाडणे, प्रभावशाली नेते आपल्या गोटात आणणे आणि प्रत्येक स्थानिक संस्थेत सत्ता हस्तगत करणे. हीच रणनीती आता सांगोल्यातही दिसू लागल्याने राजकारणात हलचल निर्माण झाली आहे. भाजपचा पक्ष विस्ताराचा खेळ प्रभावीपणे चालू असला, तरी पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सांगोला तालुका पारंपरिकरित्या शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. ‘ऋषितुल्य’ म्हणून ओळखले गेलेले स्व. आबासाहेब यांच्या काळात शेकापची पकड एवढी भक्कम होती की कोणताही बाहेरचा पक्ष येथे सहज शिरकाव करू शकला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा आणि समाजाशी असलेल्या नात्याचा प्रभाव इतका मजबूत होता की सांगोल्यातील शेकापचे वर्चस्व अढळ वाटत होते. मात्र आबासाहेबांच्या निधनानंतर शेकापच्या संघटनेत हळूहळू पोकळी निर्माण होऊ लागली. पिढ्यांतील दरी वाढली, तरुण नेतृत्वाची कमतरता भासू लागली आणि याच रिकाम्या जागेत भाजपने आपले प्रभावक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला.
मागील काही महिन्यांत याच रणनीतीचा प्रत्यय येऊ लागला. शेकापच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील अनेक नेत्यांना भाजपने आपल्या गोटात ओढून घेतले. राजकीय निरीक्षकांच्या मते काहींना तिकीटाची शक्यता, काहींना पदांचा मोह आणि काहींना सत्तेची जवळीक—या कारणांमुळे त्यांनी पक्षांतर केले. ही एक घटना असती तर कदाचित त्याकडे दुर्लक्ष झाले असते, पण अशा धडाधड घडणाऱ्या घटनांनी शेकाप कमकुवत होत गेली आणि भाजप शक्तिशाली होत गेल्याचे चित्र निर्माण झाले.
या वातावरणात सर्वात मोठा धक्का म्हणजे शेकापने सांगोला नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या मारुतीआबा बनकर यांचा अचानक भाजपात प्रवेश. हा निर्णय संपूर्ण सांगोल्यात कडाडून चर्चेत आला आहे, कारण मारुतीआबा हे केवळ लोकप्रियच नव्हे तर स्वच्छ प्रतिमेचे, अनुभवी आणि सर्वमान्य नेते मानले जातात. नगरपालिकेत सुमारे चाळीस वर्षांची त्यांची कारकीर्द, दोन वेळा नगराध्यक्ष पद, विविध विकासकामांचा अनुभव आणि लोकांमध्ये असलेला सन्मान—यामुळे त्यांचा पक्षांतर हा एखाद्या साध्या उलटफेरीसारखा नव्हे तर राजकीय भूकंपासारखा भासतो आहे.
भाजपने मारुतीआबा सारख्या मोठ्या चेहऱ्याला आपल्या गोटात आणून आपला मास्टर स्ट्रोक साधला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचा सांगोल्यातील तळ अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र याचवेळी भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच सूर उमटू लागला आहे. कारण पक्ष बांधणीसाठी वर्षानुवर्षे राबणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रत्येक निवडणुकीत बाहेरगावच्या किंवा विरोधी पक्षातून येणाऱ्या नेत्यांना तिकीट देताना पाहावे लागते. मेहनत आपली आणि फळ बाहेरून आलेल्यांचे—ही भावना आज सांगोल्यातील भाजपच्या तळागाळात पसरू लागल्याचे राजकीय समालोचकांचे मत आहे.
सोलापूरमध्ये नुकताच असाच प्रसंग घडला. माजी आमदार दिलीप माने भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती, त्यांचे स्वागत करण्याची तयारीही होती. पण स्थानिक ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आणि शेवटी माने भाजपच्या उंबरठ्यावरच थांबले. हे उदाहरण सांगोल्यातील राजकीय चर्चेत वारंवार येत आहे. ‘‘सांगोल्यातही असा विरोध होणार नाही का?’’ असा प्रश्न तळागाळातील अनेक भाजप कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
सांगोल्यात भाजप पूर्वी ताकदीने कमजोर होती. पण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या सक्रिय कार्यपद्धतीमुळे संघटना वाढू लागली. श्रीकांत देशमुख, शिवाजीराव गायकवाड आणि इतर जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी सातत्याने मेहनत घेतली. आता अचानक बाहेरून आलेल्या लोकप्रिय नेत्यांना थेट तिकीट किंवा नेतृत्व स्थान दिल्याने हेच जुन्या कार्यकर्त्यांचे मन दुखावले जाईल का, हा प्रश्न उभा राहतो. ‘‘नवागतांचे स्वागत असलेच पाहिजे, पण निष्ठावंतांना विसरू नये,’’ अशी भूमिका त्यांच्यात दिसते आहे.
भाजपला सांगोल्यात सत्ता प्राप्त करायची असल्यास नवागतांचे आकर्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बांधिलकीचे आहे. पक्षाच्या वाढीचा पाया हे कार्यकर्तेच असल्याने नाराजी वाढली तर त्याचे दुष्परिणाम निवडणुकीत दिसू शकतात. सांगोल्यातील नागरिकही ही राजकीय हालचाल लक्षपूर्वक पाहत आहेत. शेकापचा गड पाडण्याची भाजपची रणनीती यशस्वी होते आहे, मारुतीआबा यांसारख्या नेत्यांचा प्रवेश प्रभावी ठरत आहे, पण या खेळात पक्षातील जुन्या माणसांची मनधरणी हे पालकमंत्र्यांसाठी आणि स्थानिक नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
अर्थात, सांगोला नगरपरिषद निवडणूक आता केवळ विकासाच्या मुद्द्यांवर मर्यादित राहत नाही; ती आता निष्ठा विरुद्ध नव्या समीकरणांची लढाई ठरू पाहते आहे. भाजपने खेळी केली आहे, गोट वाढवला आहे, शेकापमध्ये धक्का दिला आहे. मात्र तळागाळातील कार्यकर्त्यांची भावना दुखावली गेली तर या खेळीचे फायदे आणि तोटे दोन्ही पक्षाला भोगावे लागतील. ‘‘बंदखोरांचे स्वागत करा, पण आपल्या निष्ठावंतांना नाराज होऊ देऊ नका,’’ हीच भाजप कार्यकर्त्यांची माफक पण अत्यंत महत्त्वाची अपेक्षा आहे.
